ठाणे महापालिका निवडणूक: रुग्णवाहिकेतून येऊन संगीता दवणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अशातच ठाणे महापालिकेतील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महिला उमेदवार संगीता दवणे या थेट रुग्णवाहिकेतून येत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाल्या. संगीता दवणे ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मधून निवडणूक लढवत असून त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यामागची पार्श्वभूमी थरारक ठरली आहे. सोमवारी सकाळी संगीता दवणे घरी जेवण बनवत असताना अचानक प्रेशर कुकरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू होते. दरम्यान, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी धाडसी निर्णय घेतला. रुग्णालयातून थेट रुग्णवाहिकेतून प्रभाग समिती कार्यालयात येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या जिद्दी आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत असून ही घटना सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे. संगीता दवणे यांची त्यांच्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.