संगीत मंदारमालाची रसिकांवर मोहिनी

सोलापूर:- 'संगीत मंदारमाला' या तीनअंकी संगीत नाटकाने सोलापूरकरांच्या हृदयावर गारुड केले. अलंकारिक भाषाशैलीचे लेखक विद्याधर गोखले, पं. राम मराठे यांच्या सुरेल चाली आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हे नाटक संस्मरणीय ठरले. हुतात्मा स्मृती मंदिरात पं. राम मराठे आणि पद्माकर देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सांस्कृतिक खात्याचे दीपक कुलकर्णी, ज्येष्ठ नाट्यकलावंत विद्या काळे आणि पं. आनंद बदामीकर यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नियोजनाखाली, अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. पं. राम मराठे फाउंडेशनच्या निर्मितीत सादर झालेल्या या नाटकात भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे आणि मकरंद पाध्ये यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

नाट्यसंगीताची जादू:
'जय शंकरा गंगाघरा', 'जयोस्तुते हे उपादेवते', 'सोहम् हर डमरू बाजे', 'ए गुलबदन' आणि 'फुलोसा नाजूक तन तेरा' यांसारख्या नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संगीत दिग्दर्शक घनश्याम जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे नाटक गायक कलाकारांच्या सादरीकरणामुळे अजूनच उंचावले. राग अहिरभैरव, अडाणा, कानडा, आसावरी, तोडी, जयजयवंती आणि बसंत या रागांतील नाट्यपदांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. विशेषतः गुरू मंदार आणि राजगायक मदनगोपाळ यांच्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. शेवटी 'तो गिरिजाशंकर' या भैरवीने नाटकाची सुरेख सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल धाबळ यांनी केले.