भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती; हजारो भाविकांनी केले संगमध्ये शाही स्नान

मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल  येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी सायंकाळी आमदार सुभाष देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर यांच्या हस्ते  भक्तीमय वातावरणात संगम आरती  करण्यात आली.  महाशिवरात्री निमित्त पहाटे श्री संगमेश्वर देवास  महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाचा अभिषेक करून, पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वर्चन अर्पण करून हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या बावीस वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करीत आहेत. सायंकाळी,संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादा श्री.संगमेश्वर देवाच्या जयघोषात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर या दाम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते संगम आरती करण्यात आली. यावेळी डॉ.चनगोंडा हविनाळे, संगप्पा केरके , मधुकर बिराजदार, आण्णाराव पाटील, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, बाबुराव पाटील, पंडीत पुजारी, देविन्द्रप्पा पाटील, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार  हणमंत बगले उपस्थित होते.