वाळूमाफिया व त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांच्या मुसक्या आवळणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा

सोलापूर: वाळूची तस्करी ही अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्यानेच होत असल्याचे सांगत यापुढे वाळूचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक  थांबली नाही तर वाळूमाफियांबरोबरच संबंधित अधिकार्‍यांच्याही मुसक्या आवळणार असल्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. गुरुवारी, झालेल्या नियोजन समितीच्या सभेत आमदार अभिजित पाटील यांनी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला. वाळू तस्करांनी माढ्याच्या महिला प्रांताधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असून जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर झालेल्या चर्चेनंतर व पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी वाळू माफियांना आवरण्याबरोबरच त्यांना मदत करणार्‍या अधिकारी व पोलिसांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक वाढल्याच्या तक्रारी आहेत. अधिकार्‍यांच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत तस्करांची मजल जात आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक तातडीने थांबवा. माझ्या सूचनेनंतर मोहीम तीव्र करुन हप्ते वाढवून घेऊ नका. जे अधिकारी वाळू तस्करांना मदत करतील किंवा त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, असे पालकमंत्री गोरे म्हणाले.  अधिकार्‍यांच्या सहकार्याशिवाय वाळूची तस्करी होऊच शकत नाही, असा आपला अनुभव आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून कुठेतरी अभय मिळाल्याशिवाय अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या घटना घडत नाहीत. हे नक्की आहे. पण यापुढे अशा घटना घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील. प्रशासनाने मनावर घेतले तर वाळू तस्करी पूर्णपणे थांबणार आहे आणि मला तेच अपेक्षित असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

चुकून तुतारी हाती : आमदार खरे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार राजू खरे म्हणाले, आपण दुष्काळी भागाचे पालकमंत्री झालात. पण आमच्या मतदारसंघात मुरूम, माती आणि वाळू उपसा होतो. येथे सरंजामशाही सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. यापूर्वी आपण दोघे अनेक वर्षे शिवसेनेत काम केले आहे. मी तर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. परंतु मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली. आमदार खरे यांच्या या वक्तव्याने सभागृहातील सर्वजण आश्चर्यचकित झाले.