संभल हिंसाचारप्रकरणी शाही जामा मशिदीचे अध्यक्ष जफर अली ताब्यात

संभल, २३ मार्च २०२५: उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी शाही जामा मशिदीचे अध्यक्ष जफर अली यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संभलचे पोलीस अधीक्षक किशनकुमार बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जफर अली यांच्यावर दंगलीस चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

दंगलीतील सहभागाचा आरोप: २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संभलमध्ये उसळलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. SIT च्या तपासात जफर अली यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोप आहे की त्यांनी समाजात तणाव निर्माण होईल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे हिंसाचार उफाळून आला.

सुरक्षा व्यवस्था कडेकोट : जफर अली यांना ताब्यात घेतल्यानंतर संभलमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस आणि राखीव दलाचा फ्लॅग मार्चही काढण्यात आला. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील कारवाई: जफर अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, SIT कडून तपास सुरू आहे. न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.