संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला; शासकीय रुग्णालयात दाखल

सांगली  १५ एप्रिल २०२५:- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि प्रखर हिंदुत्ववादी नेता संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री सांगलीत घडली. माळी गल्ली परिसरात रात्री ११ च्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवण करून परतत असताना, एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात भिडे गुरुजी जखमी झाले असून, त्यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. संभाजी भिडे हे महाराष्ट्रभर धारकरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनुयायांसह शिवप्रेमासाठी गडकोट मोहिमा राबवतात. त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली असून, त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भाजपसह इतर हिंदुत्ववादी पक्षांतील अनेक नेते त्यांना आपला गुरू मानतात.