सोलापुरात 'सालार टोळी'वर मोक्का अंतर्गत कारवाई

संचार प्रतिनिधी

सोलापूर, दि. 26 -
शहरात दहशत निर्माण करणाऱ्या 'सालार टोळी'वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांपासून खून, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत आणि धमक्यांसारखे गंभीर गुन्हे करून परिसरात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या या टोळीच्या विरोधात सोलापूर शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.
फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम उर्फ पैलवान कय्युम सातखेड आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार अशी मकोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मौलाना आझाद चौक, नई जिंदगी, येथे सोहेल रमजान सय्यद यांनी आरोपींना दिलेले उसने पैसे परत मागितले. यावरून जाफर शेटे, टिपू सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेल्या 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फैसल सालार याने "मी इथला भाई आहे, कुणी पुढे आलं तर त्याला खल्लास करून टाकेन" असे म्हणत चाकूसह धमकी दिली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील लोक घाबरून पळू लागले आणि दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. याच दरम्यान, फैसल सालार याने सय्यद यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सय्यद यांनी प्रसंगावधान राखत डावा हात मध्ये घातल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि ते खाली पडले. त्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले.
या घटनेनंतर सोहेल रमजान सय्यद यांनी फैसल सालार (रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी), जाफर शेटे (रा. पेंटर चौक), टिपू सालार (रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी), पापड्या (अॅम्ब्युलन्स चालक), अक्रम पैलवान (रा. विजापूर वेस) आणि त्यांच्यासोबत असलेल्या 3 ते 4 अनोळखी इसमांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याच्या तपासात आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम उर्फ पैलवान कय्युम सातखेड आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार हे 'सालार टोळी'चे सदस्य असल्याचे समोर आले. या टोळीने 2015 ते 2025 या दहा वर्षांच्या कालावधीत स्वतःच्या किंवा टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी आणि परिसरात वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून खून, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्यांसारखे 7 गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गंभीर गुन्हेगारीची दखल घेत, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी 'सालार टोळी'विरूध्द मोका कारवाई करण्यास करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, आता या गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे वाढवण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजन माने करत आहेत.