बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालची स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय बॅडमिंटन विश्वातील सुवर्णअध्याय संपुष्टात आला
आहे. बॅडमिंटन क्वीन म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक
बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून
गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे सायना खेळापासून दूर होती. अखेर शरीर साथ देत
नसल्याचे सांगत तिने आपल्या यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. सायनाचा शेवटचा
आंतरराष्ट्रीय सामना २०२३ सिंगापूर ओपनमध्ये झाला होता. त्यानंतर ती कोणत्याही
स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कठीण निर्णय एका
पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने आपल्या निवृत्तीमागचे कारण स्पष्ट केले. ती म्हणाली,
“माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे आणि मला संधिवात झाला आहे.
सर्वोच्च पातळीवर खेळण्यासाठी दिवसाला ८ ते ९ तास सराव आवश्यक असतो. मात्र माझा
गुडघा अवघ्या एक-दोन तासांतच साथ सोडायचा. सूजही येत होती. अशा स्थितीत पुढे खेळणे
अशक्य झाले. जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा थांबणेच योग्य
असते.” सायनाने पुढे सांगितले की, आपल्या
शारीरिक स्थितीबाबत तिने पालक आणि प्रशिक्षकांना आधीच कल्पना दिली होती. औपचारिक
निवृत्ती घोषणेपेक्षा, स्पर्धांमधील आपली अनुपस्थितीच
चाहत्यांना सर्व काही सांगेल, असा विश्वासही तिने व्यक्त
केला. इतिहास घडवणारी कारकीर्द सायना नेहवालने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत
इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला
खेळाडू ठरली. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतरही तिने जिद्दीने
पुनरागमन केले आणि २०१७ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तसेच २०१८
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिने भारताचा अभिमान उंचावला. लंडन
ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाने जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सायनाच्या
निवृत्तीने क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.