शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सद्भावना सप्ताह.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त पदाधिकाऱ्यांमार्फत पक्षाच्या ११ ते १८ डिसेंबर दरम्यान सद‌भावना सप्ताह आयोजिल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुधवारी अशोक चौकातील पक्षाच्या संपर्क कार्यालयात धान्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला असून पदाधिकारी राबविणार विविध सामाजिक उपक्रम उद्या (गुरुवारी) बाल संस्कार केंद्र येथे अनाथ मुलांना अन्नदान कार्यक्रम होणार आहे. तसेच रिमांड होम आणि कुष्ठरोग वसाहत येथे खाऊवाटप करण्यात येणार आहे. नरसिंग गिरजी चाळ येथे विजय भोईटे यांच्याकडून वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. सिटीझन उर्दू प्रशाला येथे चित्रकला स्पर्धा होईल. साईनाथ विद्यालयात आणि माशाळ वस्ती विजापूर रोड येथे शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता लष्कर भागातील बेरिया हॉल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. १३ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरात ब्लॅकेट व खाऊवाटप उपक्रम घेण्यात येणार आहे. १४ डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. १५ डिसेंबर रोजी साठे शिंदे वस्ती येथे आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. त्यानंतर दमाणीनगरात कीर्तन सोहळा होणार आहे. पंजाब तालीम येथे मोफत आरोग्य शिविर घेण्यात येणार आहे. १६ डिसेंबर रोजी वेणुगोपाळनगर मारुती मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तर शांताई अनाथ आश्रम येथे खाऊवाटप कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जुळे सोलापुरातील सुमित्रा पार्क येथे घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता उपाध्यक्षा मोनिका सरकार यांच्याकडून हार्टलाईन येथील हार्ट लँड व ज्योती निकेतन येथे आकाशदिव्यांचे (ख्रिसमस स्टार) वाटप करण्यात येणार आहे. शेवटी १८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ज्येष्ठ कामगारांचा सत्कार सोहळा होणार असल्याचे शहराध्यक्ष खरटमल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. यू. एन. बेरिया, माजी महापौर मनोहर सपाटे, नलिनी चंदेले, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत वावर, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सूर्यकांत शेरखाने, खजिनदार सुनील इंगळे, सरचिटणीस शक्ती कटकधोंड, रामप्रसाद शागालोलू, सुरेश कुंभार, राकेश सोनी आदी उपस्थित होते..