स्पायडर वेब’ ऑपरेशनमध्ये रशियाची मोठी हानी – ४१ युद्ध विमाने उद्ध्वस्त

कीव : युक्रेनने रविवारी 'स्पायडर वेब' या सांकेतिक नावाने एक अभूतपूर्व गुप्त ऑपरेशन राबवत रशियामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या कारवाईत रशियातील चार लष्करी हवाई तळांवर ४१ युद्ध विमाने उद्ध्वस्त करण्यात आली, असा युक्रेनचा दावा आहे. हा हल्ला युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि देशांतर्गत गुप्तचर संस्था प्रमुख वासिल मालियुक यांच्या थेट देखरेखीखाली करण्यात आला. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये एक नवी युद्धतंत्र वापरण्यात आली. स्फोटकांनी भरलेले ड्रोन लाकडी शेडमध्ये लपवले गेले आणि हे शेड ट्रकद्वारे रशियन हवाई तळांवर पोहोचवले गेले. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर शेडचे छत रिमोट कंट्रोलद्वारे उघडले गेले आणि ड्रोननी रशियन विमानांवर हल्ला चढवला. या कारवाईचे प्रमुख लक्ष्य इरकुत्सकमधील बेलाया एअरबेस होते, जे युद्ध क्षेत्रापासून ४,३०० किमी अंतरावर आहे. येथे तैनात असलेले रशियन Tu-22M सुपरसॉनिक बॉम्बवर्षक आणि Tu-95 बॉम्बवर्षकही या हल्ल्यात जळून खाक झाल्याचे व्हिडिओंमध्ये दिसते. रशियाने देखील या हल्ल्याची पुष्टी केली असून, मुर्मन्स्क, इरकुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील लष्करी विमानतळांवर ड्रोन हल्ले झाल्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी ड्रोन निष्फळ करण्यात आले, पण काही ठिकाणी आग लागल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या ऑपरेशनसाठी दीड वर्षे नियोजन करण्यात आले होते. कमी किमतीच्या FPV ड्रोनच्या साहाय्याने रशियाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान करण्यात आले. ट्रकवर लपवून नेले गेलेले ड्रोन आणि त्यांचा हल्ला हे आधुनिक युद्धतंत्राच्या दिशेने युक्रेनचे एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर ३६७ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हवाई हल्ला चढवला होता, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. युक्रेनचा हा प्रत्युत्तरात्मक हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.