रमी गेमचा व्हिडीओ व्हायरल; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

मुंबई :-
महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये मोठा गोंधळ निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सत्रादरम्यान मोबाइलवर 'जंगली रमी' गेम खेळताना दिसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

व्हिडीओ कुणी काढला?

या व्हिडीओची सत्यता व उगम शोधण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, हा व्हिडीओ प्रेक्षक गॅलरीतून शूट करण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल लवकरच सभापती राम शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

कोकाटेंचं स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेत कोकाटे म्हणाले:

"मी रमी गेम खेळत नव्हतो. सत्र स्थगित झाल्यानंतर यूट्यूबवर विधानसभेचे कामकाज पाहत होतो. त्याचवेळी जंगली रमीचा एक पॉपअप आला, जो मी 10-15 सेकंदात स्कीप केला." त्यांनी आरोप केला की, हा व्हिडीओ एडिट करून खोटी प्रतिमा निर्माण केली जात आहे आणि हा बदनामीचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी संदर्भातील वादही सुरू कोकाटे यांनी यापूर्वी केलेल्या एका विधानामुळेही वाद उभा राहिला आहे. ते म्हणाले होते की, "मी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले नाही, सरकार भिकारी आहे कारण ते शेतकऱ्यांकडून एक रुपया पीक विम्यासाठी घेतं." या विधानावरही जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.