जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विविध कामगिरीची पाहणी

विजयपूर  :- केंद्र सरकारच्या पिण्याच्या पाणीसाठी आणि स्वच्छतेसाठीच्या विभागाकडून नियुक्त केलेल्या केंद्रिय नोडल अधिकाऱ्यांनी  नीडगुंदी तालुक्यातील आलमट्टी, अब्बिहाळ, गुडदिन्नी आणि बेनाळ आर.सी. गावांमध्ये ग्रामीण पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विविध कामांची पाहणी केली. केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाचे संयुक्त सचिव अलोक तिवारी यांनी जळधारा योजनेअंतर्गत आलमट्टी धरणातून बसवन बागेवाडी, कोल्हार, नीडगुंदी, विजयपूर, बबलेश्वर, तिकोटा, इंडी आणि चडचण तालुक्यांमध्ये बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या (WTP) कामाचे निरीक्षण केले.  जॅकवेलचे काम आणि डिझाईन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि जलशुद्धीकरण केंद्र व जॅकवेलची कामे उच्च दर्जाची असावी, तसेच निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. वंदाळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील अब्बिहाळच्या बाहेरील भागात उभारण्यात येणारे प्रशासकीय विभाग, क्लोरीनेशन शेड, कॅस्केड एरेटर यांसारख्या विविध टप्प्यातील कामांची गुणवत्ता त्यांनी तपासली. बेनाळ आर.सी. ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन, ग्रामीण पिण्याचे पाणी आणि स्वच्छता समिती (WSC) सदस्य, वॉटरमॅन आणि ग्रामस्थांसोबत केंद्रिय नोडल अधिकाऱ्यांनी संवाद साधला. अलोक तिवारी म्हणाले की, समिती सदस्यांनीही पाण्याच्या तपासणीच्या प्रक्रियेबाबत सखोल माहिती घेतली पाहिजे. जलस्रोतापासून पाण्याचे नमुने गोळा करून नियमितपणे त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बेनाळ गावातील गुंडप्पा सी. मुत्तलदिन्नी यांच्या घरी भेट देऊन त्यांनी एफटीके किटच्या साहाय्याने पाण्याच्या गुणवत्ता चाचण्या केल्या. चिम्मलगी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुडदिन्नी गावालाही भेट देऊन जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी केली. या प्रसंगी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, नीडगुंदी तालुक्याचे पंचायत कार्यकारी अधिकारी वेंकटेश वंदाल, सहाय्यक संचालक शरण बसव बिरादार, ग्रामीण पिण्याचे पाणी आणि स्वच्छता उपविभागाचे सहाय्यक अभियंता व्ही. बी. गोंगडी, केंद्रिय तांत्रिक अधिकारी राजेश कुमार लुहादिया, बेनाळ ग्रा.पं. अध्यक्ष रमेश बाळप्पा वंदाल, पीडीओ ए.ए. केजी तसेच ग्रामीण पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

विजयपूर.        दिपक शिंत्रे