निवृत्त महासंचालकांची हत्या, पत्नी व मुलीची चौकशी सुरू

कर्नाटक राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. ओम प्रकाश यांच्यावर त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी चाकूने तब्बल 10 वेळा वार केला असून, यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना इतकी भीषण होती की, हॉलमधील संपूर्ण परिसर रक्ताने माखलेला आढळून आला. हल्ल्यानंतर ओम प्रकाश जवळपास वीस मिनिटे तडफडत होते, अशी माहिती पल्लवी यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिसही तपासात गुंतले आहेत. पल्लवीला अटक, मुलगी कृती ताब्यात ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पत्नी पल्लवीला अटक करण्यात आली आहे, तर मुलगी कृतीकडे चौकशी सुरू आहे. हत्या केवळ कौटुंबिक व मालमत्तेच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेषतः कारवार जिल्ह्यातील दांडेली येथील कोट्यवधींची जमीन या वादात केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. काय घडले हत्येच्या दिवशी? पल्लवी यांनी पोलिसांना सांगितले की, "ओम प्रकाश वारंवार आम्हाला बंदुकीने गोळ्या घालण्याची धमकी देत होते. त्या दिवशी घरात सतत भांडण सुरू होते. दुपारी वाद टोकाला गेला आणि त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला." त्यामुळे, "स्वतःचा बचाव करण्यासाठी मिरचीपूड व खाद्यतेल त्यांच्या डोळ्यांत फेकले आणि नंतर चाकूने हल्ला केला. चाकूच्या वारांनंतर त्यांनी चेहरा कापडाने बांधला. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ओम प्रकाश यांचा मृत्यू झाला." तिसरी व्यक्ती कोण? पोलिस तपासात एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय - त्या दिवशी घरात तिसरी व्यक्तीही होती, हे पल्लवी यांनी मान्य केले आहे. आता ती व्यक्ती नेमकी कोण होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. कोट्यवधींच्या मालमत्तेचा वाद ओम प्रकाश 2017 मध्ये सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी बंगळूरसह विविध जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलाच्या नावे नोंदवली गेली. दांडेलीतील जमीन मात्र बहिणींच्या नावावर असल्याने, पल्लवी यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि वादाला तोंड फुटले. पोलीस तपास सुरू HSR लेआउट पोलिसांनी पल्लवी आणि कृती यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस तपासात अजूनही काही आर्थिक किंवा कौटुंबिक पैलू उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हत्येमागे अन्य कोणतेही षड्यंत्र होते का, याचाही शोध सुरू आहे.