मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेत बंदीचा ठराव ; ग्रामविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

अहिल्यादेवीनगर : मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेत बंदी घालण्याच्या ठरावाला उपस्थित असणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यांना गटविकास अधिकार्‍यांनी नोटीस बजावली असून 24 तासात खुलासा करण्याचे त्यात म्हटले आहे. मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यावसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर केल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अनिल सूर्यभान लवांडे असे नोटीस बजावलेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव आहे. नियमबाह्य ठराव का केला? असे नमूद करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामसभेस जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचे तसेच ठरावाचे सूचक व अनुमोदक यांचेही जबाब घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मढीचे सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत केवळ घरकुलांचे विषय घ्या, असे आदेश पंचायत समिती प्रशासनाने दिले असतानाही एनवेळेसच्या विषयात मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख, माजी सभापती मिर्झा मणियार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, वैभव दहिफळे, शिवाजी बडे, प्रशांत टिमकरे, बंडू पाटील बोरुडे, चंद्रकांत भापकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत ठराव करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय जनसंसद संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक सब्बन यांनीही अशीच मागणी केली आहे.