ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे निधन; बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला

नागपूर : ज्येष्ठ इतिहासकार आणि इतिहासाचे साक्षेपी संशोधक प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रा. देशमुख यांच्या पार्थिवावर शिवधर्म पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम यात्रेत राज्यभरातून हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाने व्रतस्थ इतिहास संशोधक आणि बहुजनांचा बुलंद आवाज हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रा. देशमुख यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी प्रारंभी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले. प्रा. देशमुख यांचा 'मध्ययुगीन भारताचा इतिहास' हा ग्रंथ विशेष गाजला. त्यांच्या लेखनावर सरकारने बंदी घातली होती. मात्र, दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. त्यांनी 'राष्ट्रजागृती लेखमाला' अंतर्गत अनेक ग्रंथ लिहिले. 'जय जिजाऊ,' 'प्राचीन भारताचा इतिहास,' 'बहुजन समाज आणि परिवर्तन,' 'बौद्ध धम्म आणि शिवधर्म' यासह अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांच्या लेखणीतून साकारले. प्रा. देशमुख यांची लेखणी नेहमीच सामाजिक अन्याय आणि इतिहासाच्या विकृतीकरणाविरोधात झुंजली. त्यांनी समाज प्रबोधनासाठी सतत कार्य केले. त्यांच्या निधनाने बहुजन समाज एक स्फूर्तिदायक नेतृत्व गमावले आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर यांनी प्रा. देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांना बहुजन अस्मितेचा बुलंद आवाज म्हणत श्रद्धांजली अर्पण केली आहे.