बॅनर काढले... बॅनर लावले ! होर्डिंगवरून पोलीस-भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

सोलापूर: पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री महोदयांच्या स्वागतासाठी भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ‘नो डिजिटल झोन’ परिसरात परवाना न घेता बॅनर लावले. ‘नो डिजिटल झोन’ असलेल्या सात रस्ता परिसरात टोलेजंग बॅनर लागल्याचे कळताच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने ते बॅनर काढले. पोलिसांनी बॅनर लावणार्‍या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.या दरम्यान, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाचीही झाली. मात्र ही कारवाई अल्पजीवी ठरली. थोड्या वेळाने कार्यकर्त्यांनी पुन्हा बॅनर लावले. विनापरवाना बॅनर लावणे, प्रशासनाने काढल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने बॅनर झळकल्याची जोरदार चर्चा होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवारी पहिलाच दौरा होता. विकास कामांच्या नियोजनाच्या आढाव्याची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी पालकमंत्री गोरे सोलापुरात आले होते. तत्पूर्वीच स्वागताच्या फलकावरून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. स्वागत फलक काढण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान, आम्ही प्लेक्स लावण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून अर्ज केलेला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याचे कार्यकर्ते सांगत होते. भाजप कार्यकर्त्यांनी ‘नो डिजिटल झोन’मध्ये लावलेले बॅनर महापालिका हटवते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परवानगी न घेता आणि ‘नो डिजिटल झोन’मध्ये स्वागताचे बॅनर लावल्याने पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ते बॅनर हटवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. 

भाजपचे युवा नेते पैलवान प्रकाश घोडके यांनी नूतन पालकमंत्री गोरे यांच्या स्वागताचे भले मोठे स्वागताचे बॅनर लावले होते परंतु त्या बॅनरची परवानगी नसल्याने पोलिसांनी कारवाई केली. यावेळी घोडके यांनी या कारवाईला विरोध करताना पोलीस आणि घोडके यांच्यात वाद झाला. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर थोड्या वेळाने सोडूनही दिले.

जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री गोरे यांच्या स्वागताचे सात रस्ता परिसरात लावलेले डिजिटल फलक प्रशासनाने हटविले. त्यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी डिजिटल फलक लावण्यात आले.

पालकमंत्री गोरे हे गुरुवारी येत असल्याने ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे डिजिटल फलक लावण्यात आले होते. भाजपचे जिल्हा सचिव प्रकाश घोडके यांनी पालकमंत्री गोरे यांच्या स्वागताचे डिजिटल फलक सात रस्ता येथे डाक बंगल्याजवळील पेट्रोल पंपासमोर लावले होते. त्यासाठी त्यांनी महापालिकेकडे परवानगी मागणारा अर्ज केला होता, परंतु त्या बॅनरची परवानगी नसल्याने आणि सात रस्ता हा परिसर नो डिजिटल झोन असल्याने महापालिका प्रशासन व पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्या ठिकाणी लावलेले डिजिटल काढले. यावेळी घोडके यांनी या कारवाईला विरोध करताना सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि घोडके यांच्यात बराच वेळ वाद रंगला. यावेळी घोडके यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडला. त्यावेळी पोलिसांनी घोडके यांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर काही वेळाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी पालकमंत्री गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पुन्हा लावले. दरम्यान, नो डिजिटल झोनमध्ये फलक लावल्याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत दाखल झाला

नव्हता.