तीर्थक्षेत्राला धार्मिक कॉरिडॉर

धाराशिव -
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह पंढरपूर,
अक्कलकोट आणि गाणगापूर या
प्रमुख तीर्थस्थळांना जोडणारा धार्मिक कॉरिडॉर (सुसज्ज
महामार्ग) विकसित करण्याची गरज असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम
गो-हे यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीच्या
आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील, धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,
पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम यांसह विविध विभागांचे
अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
धार्मिक पर्यटनाला गती
तुळजापूर पुनर्विकास आराखड्यामुळे मंदिर परिसराचा विकास होईल तसेच संपूर्ण धाराशिव
जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. धार्मिक कॉरिडॉरमुळे भाविकांना
उत्तम सोयी-सुविधा मिळतील आणि या तीर्थस्थळांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय
स्तरावर महत्त्व प्राप्त होईल, असे डॉ. गो-हे
यांनी सांगितले.
प्रमुख विकासकामे
पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.
तेजस गर्गे यांनी सांगितले की, ५८ कोटी ११ लाख
रुपयांची विकासकामे सध्या सुरू आहेत. पुढील टप्प्यात
मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवून कुंडांचे सौंदर्यीकरण आणि मंदिर
संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.
डॉ. गो-हे यांनी केलेल्या सूचना:
1.
ऑनलाइन दर्शन सेवा:
o शिर्डी साईबाबा मंदिर आणि दगडूशेठ गणपती मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी
मातेच्या ऑनलाइन दर्शनाची सोय दूरचित्र वाहिनीद्वारे उपलब्ध करून द्यावी.
2.
भाविकांसाठी सुविधा:
o भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्राथमिक
आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे आणि पेयजल व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात.
3.
आपत्ती व्यवस्थापन:
o रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा.
4.
पारंपरिक भक्तांसाठी निवास:
o जोगते, भोपे,
भुते आणि कडकलक्ष्मी या
पारंपरिक भक्तांसाठी स्वतंत्र भक्तनिवास उभारावा.
5.
दान व्यवस्थापन:
o देवीच्या साड्या, दागिने आणि दानातील वस्तू यांची मोजणी योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रभावी
यंत्रणा उभारावी.
डॉ. गो-हे यांनी या विकास आराखड्याची दोन वर्षांत पूर्तता करण्याचे
निर्देशही दिले.