वाल्मीक कराडच्या मुलाला दिलासा महिलेची फिर्याद सोलापूर न्यायालयाने फेटाळली

सोलापूर:  बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीमध्ये अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील वाल्मीक कराड याच्यासह तिघांविरुध्द योग्य त्या अधिकारक्षेत्रात दाद मागावी, असे आदेश देऊन येथील न्यायालयात दाखल केलेली खासगी फिर्याद न्यायालयाने फिर्यादीस परत केली. वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील कराड याच्या नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स व पत्नीचे नावे असलेली फर्म अन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती व्यवस्थापक पदावर कामास होता. त्याने व्यापार्‍यांकडील होणारी वसुली स्वतःच्या व फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेऊन 1 कोटी 8 लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी सुशील कराड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाड्या, सोने व प्लॉट जागा खरेदीखतान्वये लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिले होते. फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एमआयडीसी पोलीस ठाण्याने तपास करून आठ दिवसांत त्यांचा अहवाल कोर्टात सादर करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून फिर्यादी महिलेचे गाड्या, सोने व प्लॉटजागा हे आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतल्याची कथित घटना तसेच फिर्यादीचे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची कथित घटना ही परळी, बीड येथे घडल्याने एमआयडीसी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्याने फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल कोर्टात दाखल केला होता.यात सुशील कराडच्या वकिलांनी लेखी म्हणणे व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे दाखल केली होती. त्यांचे मुद्दे ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी फिर्यादीची खासगी फिर्याद फेटाळून लावली व त्यांनी योग्य अधिकारक्षेत्रात दाद मागावी असे आदेश दिले. यात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड. श्रीकांत पवार, अ‍ॅड. मधुकर व्हनमाने यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड. संतोष न्हावकर, अ‍ॅड. राहुल रुपनर, अ‍ॅड. शैलेश पोटफोडे यांनी काम पाहिले.