चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे अटकेत

बेंगळुरू – आयपीएल २०२५ च्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघाच्या विजयोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह डीएनए नेटवर्क्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या इतर तिघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल सोसाळे मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह डीएनए नेटवर्क्स कंपनीचे किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांनाही क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू आहे. केएससीए पदाधिकाऱ्यांच्या घरावरही पोलिसांचे छापे या प्रकरणात कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी छापे टाकले. मात्र ते घरी नसल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चेंगराचेंगरीत ११ मृत्यू, ४७ जखमी १८ वर्षांनंतर RCB ने आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी झाली होती आणि गेट क्रमांक ३ जवळ चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर ४७ हून अधिक जण जखमी झाले. याप्रकरणी RCB, KSCA आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला आहे. तपासाचे केंद्रबिंदू : नियम, परवानग्या आणि सुरक्षा उपाययोजना या प्रकरणात पोलिसांकडून कार्यक्रमासाठी घेतलेल्या परवानग्यांची तपासणी, सुरक्षा मानकांचे उल्लंघन, तसेच निष्काळजीपणा आदी बाबींची चौकशी सुरू आहे. रॅलीचा नियोजित बस कार्यक्रम वाहतूक अडचणीमुळे रद्द करण्यात आला होता, तरीही हजारोंच्या संख्येने जमलेले चाहते मोठी दुर्घटना घडवून गेले.