आरबीआयकडून रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात; गृहकर्ज होणार स्वस्त

मुंबई रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आज (६ जून) झालेल्या बैठकीत रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची मोठी कपात करत दर ५.५% पर्यंत आणला आहे. या निर्णयाची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. हा दर तात्काळ लागू होणार असून त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र याचसोबत FD वरील व्याजदरात घट होणार असल्याचेही निश्चित आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, "लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधा अंतर्गत रेपो दर आता ५.५% असेल, तर स्थायी ठेव सुविधा (SDF) दर ५.२५% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर व बँक दर ५.७५% वर समायोजित केले जातील." या वर्षी तिसऱ्यांदा रेपो दर कपात संजय मल्होत्रा गव्हर्नरपद स्वीकारल्यानंतर ही तिसरी दरकपात आहे. याआधी दोन वेळा त्यांनी २५-२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. यंदा फेब्रुवारीपासून एकूण १०० बेसिस पॉइंट्स (१%) इतकी कपात झाली आहे. गृहकर्ज स्वस्त होणार, पण FD व्याज कमी रेपो दर कपात झाल्यामुळे बँका देखील आपले कर्जदर कमी करणार आहेत. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. मात्र फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात घट होईल आणि बचतदारांवर याचा परिणाम होईल. भविष्यात कपातीची मर्यादा गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, "पॉलिसीमध्ये आता फारशी जागा उरलेली नाही. त्यामुळे पुढील दरकपातीची शक्यता कमी आहे." म्हणजेच आर्थिक स्थैर्य राखत पुढे व्याजदर स्थिर ठेवले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.