रान्या राव हिच्या नावावर दुबईत तीन कंपन्या

मुंबई: कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्या सोनेतस्करी प्रकरणात आता एकानंतर एक धक्कादायक खुलासे होत आहेत. सोने तस्करी करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा दावा तिने सुरुवातीच्या चौकशीत केला होता. मात्र, या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दुबईत रान्या राव हिचा सोन्याच्या व्यापाराचा व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे. रान्या राव हिनं गोल्ड बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. दुबईसह अन्य देशांमध्येही आपला व्यवसाय विस्तारण्याचा तिचा मानस होता. तपासादरम्यान तिच्या तीन वेगवेगळ्या कंपन्यांचा शोध लागला असून, या कंपन्यांची सखोल चौकशी केली जात आहे. याशिवाय, रान्या राव हिने आपल्या सावत्र वडील आणि कर्नाटक राज्याचे डीजीपी के. रामचंद्र राव यांच्या व्हिआयपी प्रोटोकॉलचा गैरवापर करून सोने तस्करी केल्याचा संशय आहे. यामुळे रामचंद्र राव यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या रामचंद्र राव यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.