पालकमंत्री गोरे खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी

सातारा:  राज्यात  मोठी खळबळ उडवणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील बदनामी आणि खंडणी प्रकरणात आता आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. वडूज पोलिसांनी विधान परिषदेचे  माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी धडक दिली असून, त्यांच्या भूमिकेची कसून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याच अनुषंगाने वडूज पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार, आज पोलिसांनी थेट त्यांच्या घरी जाऊन तपास सुरू केला. दरम्यान, संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणात राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आणखी 11 जणांना समन्स बजावण्यात आले असून, त्यात रामराजे नाईक निंबाळकर यांचाही समावेश आहे. पोलीस सखोल तपास करत असून, लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.