बाळासाहेब सरवदे खून प्रकरणावर राज ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया

सोलापूर :- सोलापूरमध्ये बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरून गेले असताना, या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप करत, गुन्हेगारांवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. राज ठाकरे म्हणाले, सोलापूरसारख्या शहरात दिवसाढवळ्या खून होत असतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षित वाटायचं तरी कसं? गुन्हेगारांना कोणाचा धाक उरलेला नाही. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, खून करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये. राजकीय दबाव, ओळखी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून जर कारवाई होत नसेल, तर ही व्यवस्था जनतेच्या जीवाशी खेळत आहे.” सरवदे कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला की, दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. हा केवळ एक खून नाही, तर कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे,” असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे.