रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का; आजपासून तिकीट दरात वाढ लागू
नवी दिल्ली: जर तुम्ही आगामी काळात ट्रेनने प्रवास करण्याचा विचार
करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकिटांच्या
किमती वाढवल्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून आजपासून नवीन भाडेदर लागू
करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास
महाग होणार आहे. भारतीय रेल्वेने तिकिटांचे दर प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढवले
आहेत. याचा थेट परिणाम २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या
प्रवाशांवर होणार आहे. उदाहरणार्थ, १,०००
किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी प्रवाशांना आता सुमारे २० रुपये अधिक मोजावे
लागणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, २६
डिसेंबरपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ लागू होणार नाही.
म्हणजेच आधीच बुक केलेल्या तिकिटांवर जुनेच दर लागू राहतील. मात्र, आजपासून स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना नवीन
दरानुसार पैसे मोजावे लागतील.
या प्रवाशांना दिलासा
नवीन भाडेवाढीचा परिणाम २१५ किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा प्रवास
करणाऱ्यांवर होणार नाही. तसेच, मासिक पासधारकांसाठीही
भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, दिल्ली,
कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये लोकल ट्रेनने दररोज प्रवास
करणाऱ्या लाखो प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसणार नाही. रेल्वे मंत्रालयाने २१
डिसेंबर रोजी या दरवाढीची घोषणा केली होती. या भाडेवाढीमुळे रेल्वेला सुमारे ६००
कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल, असा दावा रेल्वे
प्रशासनाने केला आहे.
वर्षातील दुसरी दरवाढ
२०२५ मध्ये रेल्वेने ही दुसरी तिकीट दरवाढ केली आहे. याआधी १ जुलै
रोजी नॉन-एसी गाड्यांसाठी प्रति किलोमीटर १ पैसा आणि एसी वर्गासाठी प्रति किलोमीटर
२ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. वाढती महागाई आणि सेवा सुधारण्यासाठी ही दरवाढ
आवश्यक असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा
देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.