रायगडचा झेंडा तटकरे यांच्या हाती; गोगावले म्हणाले, “तलवार म्यान केलेली नाही”

मुंबईरायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा गोंधळ अद्यापही सुटलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या 28 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार, येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजवंदन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांच्या पालकमंत्रीपदावर वर्णी लागणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भूसे इच्छुक आहेत, तर रायगडसाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये गोगावले समर्थकांनी आंदोलन करत गोंधळ घातला होता. यामुळे राज्य सरकारने या दोन पालकमंत्री पदांवरील नियुक्ती स्थगित केली होती. मात्र आता, महाराष्ट्र दिनासाठी जिल्हास्तरावरील कार्यक्रमांची जबाबदारी तटकरे आणि महाजन यांच्याकडे दिल्यानंतर पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावर त्यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.

गोगावलेंची तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान, रायगडमध्ये तटकरे यांना ध्वजवंदनाची जबाबदारी मिळाल्यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात म्हटले की, “झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिले असं नाही. मी रायगडचा मावळा आहे, तलवार म्यान केलेली नाही.”