पुरी रथयात्रा 2025 : गजपती महाराज सोन्याच्या झाडूने रस्ता स्वच्छ करतील; जाणून घ्या छेरा पहरा परंपरा

पुरी : – हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सोहळा असलेली जगन्नाथ रथयात्रा आज (दि. २७) आषाढ शुक्ल द्वितीया तिथीपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू झाली. या प्रसंगी पुरीच्या राजघराण्याचे प्रमुख आणि जगन्नाथ मंदिराचे मुख्य सेवक गजपती महाराजा दिव्यसिंह देब यांनी परंपरेनुसार ‘सोन्याच्या झाडूने’ रथमार्ग स्वच्छ करून ‘छेरा पहरा’ विधी पार पाडला. या यात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा रथामध्ये स्वार होऊन पुरी नगरात भव्य नगरफेरीला निघतात. लाखो भक्त रथ ओढण्यासाठी पुरीत दाखल झाले असून, रथ ओढल्याने सर्व पापे नष्ट होतात, असा श्रद्धाभाव मानला जातो. पौराणिक कथेनुसार, देवी सुभद्रेच्या नगरदर्शनाच्या इच्छेच्या स्मरणार्थ ही रथयात्रा दरवर्षी काढली जाते. तिन्ही रथ गुंडिचा मंदिरात जाऊन सात दिवस थांबतात. विशेष म्हणजे रथ मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला जातो, कारण सोने पवित्र धातू मानले जाते आणि या प्रथेने देवाच्या स्वागतात कोणतीही न्यूनता राहू नये, ही भावना व्यक्त होते. परंपरेनुसार, हा विधी गजपती महाराजांच्याच हस्ते होतो. छेरा पहरा विधीदरम्यान वैदिक मंत्रांचा जप केला जातो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवली जाते. यावर्षीही हा ऐतिहासिक आणि भक्तिभावपूर्ण सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.