पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दि. 30 व 31 जानेवारीला तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद

अमेरिका, दक्षिण आफ्रिकामधील तज्ञांचाही सहभाग

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3031 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विद्यापीठात दोन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

           21 व्या शतकातील तृतीयपंथीयांचे जीवन: प्रगती, समता, आरोग्य आणि जगभरातील सांस्कृतिक रुची या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत 'बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन' यामधून तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद विद्यापीठात होणार आहे. या परिषदेसाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक म्हणून प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि समन्वयक म्हणून डॉ. प्रभाकर कोळेकर हे काम पाहत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेत 110 संशोधक, विद्यार्थी शोधनिबंध सादर करणार आहेत. एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.  गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन तोसवान विद्यापीठ, अमेरिका येथील तज्ञ पल्लवी गुहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे असणार आहेत. समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती येणार आहे. याचबरोबर यावेळी दक्षिण आफ्रिका येथील अबोंगीली मटियाला आणि सॅन फ्रान्सिसको येथील विधा पाटील यांचाही यावेळी ऑनलाइन माध्यमाद्वारे मार्गदर्शन होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सानवी जेठवाणी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिली सरपंच ज्ञानेश्वर कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमही होईल. शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समारोपाचा कार्यक्रम पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शमीबा पाटील या उपस्थित राहणार आहेत. तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या याबाबत दोन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चर्चा होईल, मंथन होईल. यात  अध्यापक, संशोधक व तृतीयपंथीयांचा सहभाग असेल. समाजातील एका वेगळ्या विषयावर संशोधनाच्या अनुषंगाने चर्चा होईल. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिजमोहन फोफलीया यांचेही यासाठी सहकार्य लाभल्याचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते.