पुण्यातील खराडी हत्याकांड उघड – गळा दाबून झाली हत्या, तिघांना अटक
.jpeg)
पुणे – हडपसरमधील खराडी परिसरात रंगपंचमीच्या दिवशी (१५ मार्च) झालेल्या एका
तरुणाच्या मृत्यूमागे खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू
म्हणून दाखल झालेल्या या प्रकरणात आता चंदननगर पोलिसांनी तीन जणांविरोधात खुनाचा
गुन्हा नोंद केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. मयत
तरुणाचे नाव आकाश सुनील साबळे (वय ३०, रा. माढा कॉलनी,
नागपाल रोड, चंदननगर) असे आहे. ससून
रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदन अहवालात आकाशचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला असल्याचे
स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी प्रशांत माने याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शशिकांत
मच्छिंद्र घोरपडे (३४), रोहित आनंद मोरे (२३) आणि यश रघुनाथ
डांगे (२१) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
१४ मार्च रोजी आकाश साबळे, रोहित मोरे आणि यश डांगे यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने
पार्टी केली. आकाश, घोरपडेच्या रिक्षातून खराडी परिसरात आला
होता. पार्टीनंतर चौघांनी हॉटेलमध्ये बिर्याणी व दारू पार्टी केली. पार्टीनंतर
आकाश हॉटेलमध्येच थांबला. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडत नसल्याने, हॉटेल मॅनेजरने मास्टर कीने दरवाजा उघडला असता आकाशचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन
अहवालात गळा दाबल्याचे समोर आल्याने प्रकरणाचा गुन्हा खुनात रूपांतरित करण्यात
आला. सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सुरू असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेला
रंगपंचमीच्या जल्लोषात झालेल्या वाद वा इतर कोणत्या कारणांमुळे वळण लागले, याचा तपास पुढील काळात स्पष्ट होणार आहे.