सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर पूजा जाधव यांची उमेदवारी माघारी; लक्ष्मण हाकेंची जोरदार टीका
पुण्यात काल घडलेल्या एका राजकीय घडामोडीने राज्यभरात
मोठी चर्चा रंगली आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपकडून
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पूजा जाधव यांना अखेर निवडणुकीतून माघार घ्यावी लागली
आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झालेल्या ट्रोलिंगनंतर त्यांनी हा निर्णय
घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया तसेच मराठा
आरक्षण आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे
पूजा जाधव यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या
पार्श्वभूमीवर पूजा जाधव आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेत
स्पष्टीकरण दिले. माझ्या विधानांचा विपर्यास करण्यात आला असून ज्या टीकेचा उल्लेख
केला जात आहे, ती मी केलीच नाही, असा
दावा पूजा जाधव यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावर ओबीसी
समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “पूजा जाधव आणि
धनंजय जाधव यांचे ‘लगा-लगा’ आणि ‘मला बघा’ असे झाले आहे. तुम्ही वर्षाला एक पक्ष
बदलता. पूजा मोरे यांनी यापूर्वी काय-काय वक्तव्ये केली आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे,” अशा शब्दांत
लक्ष्मण हाकेंनी टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्ष असा
राजकीय प्रवास केल्यानंतर आता भाजपकडून निवडणूक लढवण्यावरही लक्ष्मण हाके यांनी
प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आधी ओबीसीतून उमेदवारी हवी होती, ती
न मिळाल्याने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप करत जनता सजग आहे,
असे ते म्हणाले.
याशिवाय, “पूजा जाधव हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी हैं,” असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, खासदार बजरंग सोनवणे,
आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि
राजेश टोपे यांनाही इशारा दिला. ओबीसी समाजाला दुर्लक्षित केल्यास आम्ही शांत
बसणार नाही, असा खोचक इशाराही त्यांनी दिला.
काय म्हणाल्या पूजा जाधव?
उमेदवारी माघारी घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूजा जाधव
भावुक झाल्या. “मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी काम करेन. आतापर्यंत
झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. भाजपला जिथे गरज असेल तिथे काम करणार आहे. वाघीण
जखमी झाल्यावर अजून जोरात काम करते,” असे म्हणत त्या रडताना
दिसल्या.