पुणे: आई आणि मुलाकडून तरुणाचा फरशीने खून – चंदननगरमध्ये खळबळजनक घटना

पुणे शहरातील चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, आई आणि मुलाने मिळून एका २८ वर्षीय तरुणाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, एकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचे नाव प्रदीप अडागळे असून, त्याच्यावर फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही हल्ल्याची घटना चंदननगरमधील भाजी मंडई परिसरात रात्री ११.३० च्या सुमारास घडली. आरोपींमध्ये ऋषी काकडे, त्याची आई सुनीता काकडे आणि मित्र शुभम मांढरे यांचा समावेश असून, ऋषी आणि सुनीता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रदीपला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप अडागळे याचे ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते, आणि गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. अडागळे सातत्याने काकडे कुटुंबियांना शिवीगाळ करत असे, त्यामुळे रागाच्या भरात खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, शुभम मांढरे याचाही शोध घेतला जात आहे.