पुणे महापालिका निवडणूक : बंडखोरांचा जोर; पहिल्या दिवशी ६७ उमेदवारांनी घेतली माघार
पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी यादी जाहीर न करता थेट
एबी फॉर्म देण्याच्या निर्णयामुळे भाजपसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी
उफाळून आली आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी
पक्षनेत्यांकडून जोरदार मनधरणी सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी शहरात एकूण ६७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सध्या
पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी तब्बल २५२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. २) दुपारी तीन वाजेपर्यंत असून,
त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या
निवडणूक विभागाकडून उशिरापर्यंत काम सुरू असल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत नेमकी
आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका
निवडणुकीसाठी शहरात प्रचंड उत्सुकता असून यासाठी सुमारे १३ हजार उमेदवारी अर्जांची
विक्री झाली होती. त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत २८६
अर्ज अवैध ठरले, तर दुबार भरलेले अर्ज वगळल्यानंतर एकूण २५२३
उमेदवार अंतिम रिंगणात आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी केवळ ६७
उमेदवारांनी माघार घेतल्याने अद्यापही मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत चर्चांना वेग आला आहे. नेत्यांकडून फोन
आणि भेटी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस जवळ आल्याने गुरुवारी दिवसभर
पक्षनेत्यांकडून बंडखोर उमेदवारांना फोन, भेटी आणि बैठका सुरू होत्या. काही ठिकाणी
थेट नाराज उमेदवारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र पाहायला
मिळाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या पक्षांकडून जागावाटप निश्चित झाल्यानंतरही ५० हून
अधिक एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आघाडीतही बंडखोरीची शक्यता
कायम आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेत (महायुती) जागावाटप
अंतिम होण्याआधीच भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेकडूनही सुमारे
१५० जागांसाठी एबी फॉर्म देण्यात आले आहेत. महायुतीचा अंतिम निर्णय झाल्यास
शिवसेनेला सव्वाशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज माघारी घ्यावे लागण्याची शक्यता
व्यक्त केली जात आहे.