पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूरमध्ये मोठा अपघात; मुळशी-कोळवण रोडवर ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले .

पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना आज मुळशी तालुक्यात घडली. पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी–कोळवण रस्त्यावर अचानक अरुंद झालेल्या मार्गामुळे ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातात अनेक खेळाडू जखमी झाले असून काहींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. अरुंद रस्ता ठरला अपघाताचे कारण मुळशीतील कोळवण रोडवरून स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना तीव्र वळण आणि अरुंद रस्त्याचा अंदाज आला नाही. आघाडीच्या एका सायकलपटूचा ताबा सुटताच मागून येणारे खेळाडू एकामागोमाग एक त्याच्यावर आदळले आणि काही क्षणातच भीषण साखळी अपघात झाला. अनेक खेळाडू रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींवर तातडीने उपचार प्राथमिक माहितीनुसार, अनेक सायकलपटूंना किरकोळ जखमा झाल्या असून ४ ते ५ खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. अपघातानंतर सुमारे १५ मिनिटे स्पर्धा थांबवण्यात आली, त्यानंतर आवश्यक खबरदारी घेत रेस पुन्हा सुरू करण्यात आली. प्रशासनाच्या नियोजनावर संताप आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करताना रस्त्यांच्या स्थितीचा योग्य अभ्यास करण्यात आला नव्हता का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोळवण रोडवरील अरुंद व धोकादायक वळणाची माहिती खेळाडूंना आधी देण्यात आली नव्हती, असा आरोप सहभागी सायकलपटूंनी केला आहे. तसेच, अपघातस्थळी बॅरिकेडिंग आणि धोक्याचे सूचना फलक अपुरे असल्याचेही दिसून आले. या घटनेनंतर स्पर्धेच्या सुरक्षिततेबाबत आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, भविष्यात अशा स्पर्धांमध्ये अधिक काटेकोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.