झिपलायनिंग करताना तोल गेला, पुण्यातील तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे:- भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग दरम्यान घडलेल्या अपघातात तरल अटपाळकर (वय २३) या पुण्यातील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. तरल ही पुण्यातील नन्हे परिसरात राहत होती आणि ती कुटुंबासोबत सहलीसाठी वॉटरपार्कमध्ये गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर राईड्सचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी तरल झिपलायनिंगसाठी गेली होती. झिपलाइनच्या रोपवर चढताना तीने सुरक्षा दोर रेलिंगवर अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र उंची कमी असल्याने ती लोखंडी स्टूलवर उभी राहिली. यावेळी स्टूल हलल्याने तोल जाऊन ती थेट ३० फूट उंचीवरून खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे अटपाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरलच्या मृत्यूला वॉटरपार्कच्या निष्काळजीपणाला कारणीभूत धरले जात असून, कुटुंबीयांनी वॉटरपार्क चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.