पुण्यात स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन; धमकीही दिली

पुणे: शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका शाळेच्या बस चालकाने चार विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केले आणि "ही माहिती घरी दिल्यास जीवे मारू" अशी धमकी दिली, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी अखेर धैर्य दाखवत घरी सर्व सांगितले. यानंतर विद्यार्थिनींच्या पालकांनी नांदेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित बस चालकाला अटक केली आहे. दरम्यान, पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी बस चालकाला चांगलाच चोप दिला, अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नांदेड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत, आणि लवकरच आरोपीविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. ही घटना केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण शहराची असुरक्षितता अधोरेखित करणारी असून, शाळा प्रशासन आणि बस चालकांच्या पार्श्वभूमी तपासण्याची गरजही या घटनेतून स्पष्ट होते.