सोलापूर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; प्रवासी थोडक्यात बचावले

सोलापूर : मुंबईहून हैदराबादकडे जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. तेलंगवाडी परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी ही घटना घडली. खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक एनएल ०१ बी १८६९) सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता अधिक असली तरी सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र, बसचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने महामार्ग पोलिसांच्या मदतीने क्रेनद्वारे अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला हटवली. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी दिली.