हवाई दल प्रमुखांसोबत पंतप्रधानांची गुप्त बैठक; पाकिस्तानवर कारवाईची तयारी?

नवी दिल्ली | ४ मे – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे
झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा यंत्रणांची
धुरा स्वतः हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ
मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ४०
मिनिटे चालली असून, ती अत्यंत संवेदनशील विषयांवर केंद्रित
होती, असे सूत्रांकडून कळते. तत्पूर्वी, ३ मे रोजी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी देखील पंतप्रधानांची
भेट घेतली होती. याआधी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि संरक्षण प्रमुख जनरल
अनिल चौहान यांच्यासह संयुक्त बैठक २६ एप्रिल रोजी पार पडली होती. पंतप्रधानांनी
या बैठकीत तिन्ही दलांच्या प्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी वेळ, स्वरूप
आणि लक्ष्य याबाबतचा निर्णय सैन्याने स्वतंत्रपणे घ्यावा. या
निर्णयामुळे भारत सरकारच्या निर्णायक भूमिकेचे संकेत मिळत आहेत.
ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण
यंत्रणाही युद्धसज्ज होत असल्याचे चित्र आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने सर्व
कर्मचाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यावरून देशभरात
युद्धपातळीवरील तयारी सुरु असल्याचे स्पष्ट होते.
सरकारची स्पष्ट भूमिका: दोषींना कठोर शिक्षा
केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, पहलगाम हल्ल्याचे दोषी आणि कटकारस्थान करणाऱ्यांना कठोर
शिक्षा दिली जाईल. देश दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड न करता निर्णायक कारवाई करेल,
असा सरकारचा निर्धार आहे.