पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा १२ फेब्रुवारीपर्यंत फ्रान्स दौरा असेल. त्यानंतर त्यांचा २ दिवसांचा अमेरिका दौरा आहे. फ्रान्सच्या भेटीदरम्यान ते पॅरीसमध्ये एआय शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. येथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत एआय अॅक्शन समिटच्या तिसऱ्या आवृत्तीचे सहअध्यक्षपद भूषवतील. दरम्यान, पीएम मोदी यांचे मॅक्रॉन यांनी पॅरिसमध्ये जोरदार स्वागत केले.  पीएम मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे, "पॅरिसमध्ये माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटून खूप आनंद झाला." तर मॅक्रॉन यांनी, "माझे मित्र नरेंद्र मोदी यांचे पॅरिसमध्ये स्वागत आहे! तुम्हाला भेटून आनंद झाला! AI एआय शिखर परिषदेसाठी आमच्या सर्व भागीदारांचे स्वागत आहे. लेट्स गेट टू वर्क!" अशा शब्दांत पीएम मोदी यांचे स्वागत केले आहे. डिनरवेळी पीएम मोदी यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचीही भेट घेतली. ते देखील एआय शिखर परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदी यांचे पॅरिसमध्ये पोहोचले. येथे त्यांचे फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे मंत्री सेबॅस्टियन लेकॉर्न यांनी स्वागत केले.

पी एम मोदी फ्रांस विझिट | "मोदी, मोदी", "भारत माता की जय"च्या घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमला

पीएम मोदी यांचे विमानतळावर भारतीय समुदायाने "मोदी, मोदी" आणि "भारत माता की जय" च्या जोरदार घोषणा देत स्वागत केले. या भव्य स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पीएम मोदी यांनी, हा एक स्वागताचा संस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी भारतीय समुदायाची कामगिरी आणि त्यांनी दिलेल्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे कौतुक केले.  पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी म्हटले होते की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार मी १० ते १२ फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देत आहे. या दौऱ्यातील द्विपक्षीय भेटींच्या नियोजनाअंतर्गत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी २०४७ होरायझन रोडमॅपसंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.  फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर पीएम मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून २ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.