अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु; 'सरकारने विकसित भारताच्या योजनेला नवीन ऊर्जा दिली' : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज शुक्रवार पासून प्रारंभ झाला आहे. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना संयुक्त सभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण सुरु झाले आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'भारताच्या मेट्रो नेटवर्कने आता १ हजार किलोमीटरचा टप्पा ओलांडला आहे हे कळवताना मला आनंद होत आहे. मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. सुलभ कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी आणि शहरी पर्यटनाला चालना देण्यासाठी देशात १५ रोपवे प्रकल्प देखील सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'देशातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी १ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत. देशातील कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारांचा खर्च लक्षात घेता, कर्करोगाच्या औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यात होणार आहे. सत्राचा पहिला भाग 13 फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा टप्पा 10 मार्चपासून सुरू होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या गोंधळात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. या सर्वेक्षणात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा लेखाजोखा मांडला जाईल. यामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील प्रमुख ट्रेंड्स तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक सूचनांचा समावेश असेल. अर्थमंत्री सीतारमण शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरे पूर्ण अर्थसंकल्प आणि सलग आठवे बजेट सादर करतील.