मुंब्रा लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर
.jpeg)
मुंब्रा | २३ जून मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून रोजी घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात प्रारंभी वर्तवण्यात आलेला गाड्यांचा परस्पर घर्षणाचा अंदाज चुकीचा ठरला असून दोन्ही गाड्या एकमेकांना स्पर्शही झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघातात अनेक प्रवासी लोकलमधून खाली पडले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.
काय घडलं होतं?
रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, अपघात घडण्याच्या वेळी दोन्ही लोकल ताशी ७५ किमी वेगाने धावत होत्या. कसाऱ्याकडून येणाऱ्या लोकलमध्ये एक प्रवासी दरवाजाजवळ उभा असताना त्याचा बाहेर निघालेला हात आणि खांद्यावरील बॅग यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या प्रवाशामुळे पाठोपाठ उभे असलेले इतर प्रवासीही खाली पडले, अशी साखळी प्रतिक्रिया निर्माण झाली. तसेच, त्याच वेळी शेजारी धावणाऱ्या दुसऱ्या लोकलमध्ये दरवाजाजवळ उभ्या असलेल्या काही प्रवाशांनाही हलकासा धक्का बसला असावा, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गाड्यांमधील अंतर किती? अहवालात स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही लोकलमध्ये फक्त 0.75 मीटरचे अंतर होते. मात्र, या अंतरामुळेही गाड्या एकमेकांना घासल्या नाहीत. सुरुवातीला सांगितले जात होते की, बॅग घासल्यामुळे अपघात घडला. मात्र, अहवालात याला पुष्टी मिळालेली नाही.
पुढील कार्यवाही: या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने दरवाजाजवळ उभे राहण्याच्या सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशिक्षण, जनजागृती मोहीम आणि CCTV चाचण्या राबवण्यावर भर दिला जाणार आहे.