गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल

सोलापूर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रमाणेच आता मोहोळ
तालुक्यातही एक धक्कादायक आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. चिंचोळी एमआयडीसी येथे
राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले (वय 28 ) या तीन
महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या
माहितीनुसार, आशाराणी हिला चारचाकी गाडी व पैशाच्या
कारणावरून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिच्या वडिलांनी हा आरोप करत पोलिसांत
तक्रार दाखल केली आहे. तिच्या सासरच्यांनी अनेक वेळा मानसिक छळ केला, यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 2024 मध्येही तिला मारहाण करून माहेरी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर महिला
तक्रार निवारण केंद्रात समुपदेशन करण्यात आलं, मात्र त्याचा
काहीच उपयोग झाला नाही. त्रास सुरुच राहिल्याने अखेर आशाराणीने आपले जीवन संपवले. या
प्रकरणी पोलिसांनी नवरा पवन भोसले याला अटक केली असून, सासू
अलका व सासरा बलभीम भोसले हे अद्याप फरार आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत
नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा निर्णय तिच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ही घटना वैष्णवी हगवणे
प्रकरणानंतर समोर आल्याने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिलांवरील
अत्याचार व घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने समाजात चिंता व्यक्त
केली जात आहे.