प्रशांत कोरटकरचे पोलिसांना गुंगारा देत थेट भारताबाहेर पलायन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु आहे. यातच आता कोरटकरसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा एक फोटो व्हायरल झाला असून त्याआधारे कोरटकर दुबईला पळाल्याचा दावा केला जात आहे. प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने नुकताच अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता असतानाच कोरटकरने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, कोरटकरच्या अर्जावर शुक्रवारी तातडीची सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सोमवारीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. असं असतानाच आता कोरटकर पळून गेल्याचा दावा फोटोच्या आधारे केला जात आहे. कोरटकरच्या व्हायरल फोटोमध्ये तो एका हॉटेलबाहेर उभा असल्याचं दिसत आहे. टी-शर्ट, जीन्स अन् डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये कोरकटकर आहे. येथील हॉटेलचं नाव उर्दूत लिहिलेलं असून हॉटेलबाहेर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा झेंडा दिसत आहे. तसेच कोरकटकर ज्या बसच्या बाजूला उभा आहे त्या बसच्या क्रमाकांवरुन ती दुबईमधील असल्याचं स्पष्ट होत आहे. याच फोटोवरुन कोरकटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्तामार्गे कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा आहे. कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे पथक प्रशांत कोरटकरच्या शोधात नागपूरमध्ये दाखल झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच गुरुवारी रात्री कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील निवासस्थानी जाऊन आले. 20 मार्चच्या रात्रीपासूनच प्रशांत कोरटकरचा शोध कोल्हापूर पोलीस घेत आहेत. कोरटकर याच्या विरोधात पुरावा नष्ट केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत कोरटकरने आपला मोबाईल पोलीसांकडे जमा करताना फॉरमॅट मारल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत असताना मोबाईल फॉरमॅट मारून कोरटकरने चूक केल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुरावा नष्ट केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल होऊन प्रशांत कोरटकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.