पोप फ्रान्सिस यांचे निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, ख्रिस्ती धर्मियांवर शोककळा

कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी युरोपमधील व्हॅटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन समाज शोकमग्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याचे आणि जीवनमूल्यांचे गौरवपूर्ण स्मरण केले. त्यांनी म्हटलं की, "पवित्र पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. जागतिक कॅथोलिक समाजाला माझ्या मनापासून संवेदना. त्यांनी करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्य यांचे प्रतीक म्हणून जगभरात प्रेरणा दिली." मोदींनी पोप फ्रान्सिस यांची ३० ऑक्टोबर २०२१ रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतली होती, ज्यावेळी कोविड-१९, हवामान बदल, गरिबी आणि शांततेवर चर्चा झाली होती. मोदींनी त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच, १४ जून २०२४ रोजी इटलीतील G7 परिषदेत दोघांची पुन्हा भेट झाली होती, यावेळीही मोदींनी त्यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण दिले. पोप फ्रान्सिस यांनी भारताविषयी आपुलकी व्यक्त करत धर्मसहिष्णुता, गरिबांसाठी काम आणि मानवतेचे मूल्य यावर नेहमी भर दिला. त्यांनी २०१६ मध्ये मदर तेरेसा यांना ‘संत’ पद बहाल केलं होतं. या सोहळ्यात भारतातून प्रतिनिधी उपस्थित होते. पोप फ्रान्सिस यांचा भारताशी बंध स्नेहपूर्ण आणि आध्यात्मिक होता, जरी त्यांचा भारत दौरा प्रत्यक्षात झाला नाही.