आंधळगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 9.62 लाखांचा मुद्देमाल जप्त, आठ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर एका घरामध्ये 52 पानांच्या पत्त्यांवर मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 9 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, विनोद शिंदे (रा. लक्ष्मी दहिवडी), हरि चंदनशिवे (रा. आंधळगाव), विजय यादव (रा. मारापुर), श्रीकांत साळे (रा. लक्ष्मी दहिवडी), निलेश लेंडवे (रा. आंधळगाव), दत्तात्रय लवटे (रा. तनाळी) आणि दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री 9.15 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कारवाई करताना तीन आरोपींना जागीच अटक केली. यावेळी 750 रुपये रोख, दोन मोबाईल, एक क्रेटा गाडी, पाच मोटरसायकली असा एकूण 9.62 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप करण्यात येत असून, मंथली घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिस अधीक्षक पथकाच्या अचानक छाप्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.