पीएम मोदींनी INS विक्रांतवर सशस्त्र दलांसह दिवाळी साजरी केली; सैनिकांच्या धैर्याचे केले कौतुक

भारतासह जगाच्या विविध ठिकाणी सध्या दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. भारतातही दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. मोदी म्हणाले, "काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिले की INS विक्रांत या नावाने पाकिस्तानची झोप उडवली होती. त्याचे सामर्थ्य इतके आहे की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शत्रूचे मनोबल कमी होते. ही आयएनएस विक्रांतची शक्ती आहे. मी आपल्या सशस्त्र दलांना विशेष सलाम करतो." पंतप्रधान पुढे म्हणाले, "आजचा दिवस अद्भुत आहे. माझ्या एका बाजूला विशाल समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद आहे. आयएनएस विक्रांतवरचा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. तुम्ही गाणी गायलीत आणि ऑपरेशन सिंदूरचे वर्णन केले, ते खूपच अद्भूत होते. युद्धभूमीवर उभा असलेला सैनिक ज्या भावना व्यक्त करू शकतो, तशा भावना इतर कोणीही व्यक्त करू शकणार नाही." ते पुढे म्हणाले, "दिवाळीच्या सणात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते. मीही तुमच्यासोबत, म्हणजेच माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी करायला आलो आहे." "आयएनएस विक्रांत देशाला सोपवण्यात आल्यापासून मी म्हटले होते की विक्रांत प्रचंड, विशाल, भव्य आणि अद्वितीय आहे. ती केवळ युद्धनौका नाही, तर २१ व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रमाण आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले.