पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
.jpeg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती दिली. या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या भेटीची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट करुनही दिली आहे.
सीमा भागातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक
तर दुसरीकडे, पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला सीमेवरील राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.
या बैठकीत जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले.