पंतप्रधान मोदींचा पाच देशांचा दौरा सुरू; घानामधून सुरुवात

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा पाच देशांचा दौरा आजपासून सुरू झाला असून त्यांनी प्रथम घाना या देशात
पाऊल ठेवले. या ऐतिहासिक दौऱ्याच्या माध्यमातून मोदी घाना, त्रिनिदाद
आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि
नामिबिया यांना भेट देतील. विशेष म्हणजे, ब्राझीलमध्ये
होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी २ ते ३
जुलै दरम्यान घानामध्ये असतील. मागील ३ दशकांनंतर घानाला भेट देणारे ते पहिले
भारतीय पंतप्रधान आहेत. घानाचे राष्ट्रपती आणि भारतीय पंतप्रधान यांच्यात
द्विपक्षीय चर्चांमध्ये आर्थिक, ऊर्जा व संरक्षण क्षेत्रातील
सहकार्यावर भर दिला जाईल. दौर्यापूर्वी बोलताना मोदींनी म्हटले की, "भारत ब्रिक्समध्ये सहकार्याचा दृष्टीकोन घेऊन कार्यरत आहे आणि जगात शांतता,
समता व लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कटीबद्ध आहे."
त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात मोदी ३ आणि ४ जुलै रोजी राहणार असून,
१९९९ नंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. या
देशातील मोठा भारतीय वंशाचा समुदाय हा भारत आणि त्यांच्यातील ऐतिहासिक-सांस्कृतिक
नात्याचे प्रतीक आहे. यानंतर ४ आणि ५ जुलै रोजी अर्जेंटिनाला भेट देताना मोदी
संरक्षण, शेती, तेल-गॅस, खाणकाम व व्यापार यासंबंधी भागीदारीवर चर्चा करतील. ब्राझीलमध्ये ६ जुलै
रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत मोदी सहभागी होतील. भारत आणि ब्राझीलमधील व्यापार
१२.२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून, औषधनिर्माण, ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवले जात आहे. दौर्याचा शेवट ९
जुलै रोजी नामिबियाला भेट देऊन होणार आहे. या दौऱ्यामुळे भारताच्या परराष्ट्र
धोरणात नवे आयाम जोडले जाण्याची शक्यता आहे.