पिंपरीत भीषण अपघात: भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; नाशिकमध्येही आईसह दोन चिमुकले दगावले.
पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात बुधवारी (दि. १४)
दुपारी घडलेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा
जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
असून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा
पांडुरंग शिंदे (वय २०, दोघी रा. पुनावळे) या बहिणी दुचाकीवरून
जात असताना काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव आयशर
ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघी
रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत
दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित
केले. काही क्षणांपूर्वी घरातून हसत-खेळत बाहेर पडलेल्या मुली अशा अवस्थेत परत
आल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणी ट्रक चालक
जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य
प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास
काळेवाडी पोलीस करीत आहेत. नाशिकमध्येही भीषण अपघात; आईसह
दोन चिमुकल्यांचा मृत्यू दरम्यान, मकर संक्रांत सणाच्या
दिवशीच नाशिक जिल्ह्यातील चांदवड–मनमाड रस्त्यावरही एक भीषण अपघात घडला.
सिमेंटच्या विटा वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने मध्य प्रदेशातील एका मजूर
कुटुंबातील आई आणि तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती
मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले. रस्त्यावर
सांडलेले साहित्य हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी
शोककळा पसरली आहे. एकाच दिवशी पुणे आणि नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या अपघातांनी
“रस्ता अपघात थांबणार कधी?” असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित
केला आहे.