संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर, धनंजय मुंडेंचा राजीनामा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात
दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर त्यातील काही महत्त्वाचे फोटो समोर आले. या
प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
स्वीकारला. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट
करत, "माझ्या सदसद् विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही
दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे," असे स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असून, तो मी स्वीकारून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला
आहे." राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही
हा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही
धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिल्याचे सांगितले, तर भाजपच्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या
प्रकरणावर टीका करत, "राजीनामा आधीच द्यायला हवा होता," असे मत व्यक्त केले.