पंढरपूर दर्शनावरून परतीचा प्रवास ठरला अखेरचा: मंगळवेढ्यात भीषण अपघात; लहान मुलासह चार भाविकांचा मृत्यू
मंगळवेढा :- “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” असा जयघोष करत पांडुरंगाचे दर्शन घेऊन समाधानाने परतीच्या प्रवासाला
निघालेल्या भाविकांचा हा प्रवास अखेर मृत्यूत संपल्याने मंगळवेढा तालुक्यात शोककळा
पसरली आहे.पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावरील शरदनगर येथे भाविकांनी भरलेल्या क्रूझर (MH
13 BN 7687) आणि ट्रक (MH 46 BU 6651) यांच्यात
समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप लहान मुलासह डोंबिवली व ठाणे येथील
तीन महिला भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ भाविक गंभीर जखमी झाले
असून काहींची प्रकृती अत्यवस्थ आहे. श्रद्धेचा प्रवास आणि नियतीचा घाला ठाणे
परिसरातील भाविक गाणगापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या
देवस्थानांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी अक्कलकोट आणि गाणगापूर येथील दर्शन
आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक परतीच्या
प्रवासाला निघाले होते. मात्र, मंगळवेढा तालुक्यातील
शरदनगरजवळ नियतीने काळाचा घाला घातला.
अपघाताचे हृदयद्रावक दृश्य अपघात
इतका भीषण होता की क्रूझरचा चालक बाजूचा भाग पूर्णतः चिरडला गेला. त्या बाजूला
बसलेले भाविक जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताने माखलेला रस्ता,
जखमींचा आक्रोश आणि निष्पाप लहानग्याचा निश्चल देह पाहून
उपस्थितांचे डोळे पाणावले. पोलीस व प्रशासनाची तातडीची मदत अपघाताची माहिती मिळताच
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, एपीआय विनोद लातूरकर,
वाहतूक विभागाचे संभाजी यादव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी
धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालय आणि ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका भाविकास पुढील उपचारासाठी सोलापूर
येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्वत्र हळहळ देवदर्शनाच्या आनंदातून
क्षणातच शोकाकुलतेत बदललेल्या या प्रवासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
श्रद्धेने सुरू झालेला हा प्रवास असा रक्तरंजित शेवट गाठेल, याची
कुणालाही कल्पना नव्हती. पांडुरंग दर्शनावरून परतीचा प्रवास ठरला अखेरचा पांडुरंगाच्या
दर्शनाने मन भरून आलेले भाविक सुखरूप घरी पोहोचतील, अशीच
प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र, नियतीने वेगळाच डाव
मांडला. एका निष्पाप लहानग्यासह चार जीवांचा असा अंत कुणाच्याही काळजाला चटका
लावणारा आहे. आज शरदनगरचा रस्ता मूक झाला असला, तरी त्या
भाविकांच्या आठवणी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश कायम मनात घुमत राहणार आहे.