"पंढरपूर : चंद्रभागेत स्नान करताना १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू"

पंढरपूर : चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिराजवळ घडली. दर्शन नारायण कोलते (रा. न्हावी, ता. यावल, जि. जळगाव) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. जळगाव जिल्ह्यातील काही तरुण सलग सुट्ट्यांमुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. आज सकाळी सर्वजण चंद्रभागेत स्नानासाठी उतरले होते. दर्शन कोलते आणि त्याचा आणखी एक मित्र नदीपात्रातील खोल पाण्यात स्नानासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. स्थानिक लोकांना दोघेजण पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. त्यावेळी एकाला वाचविण्यात यश आले. मात्र दर्शन कोलते हा तरुण पाण्यात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने दर्शनचा शोध घेण्यात आला. दरम्यान, आज दुपारी दर्शनचा मृतदेह पाण्यात आढळून आला. चंद्रभागेत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी येथील आदिवासी कोळी बांधवांनी प्रयत्न केले. त्यांच्या मदतीनेच दर्शनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चंद्रभागेच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा खड्यांमुळेच यापूर्वी देखील अनेक भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणखी एका भाविक तरुणाचा नाहक बळी गेला आहे. नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात पोलिस आणि महसूल प्रशासनाने कडक करावी, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे."